[२३३]
देहाची आसक्ती बाळगिली थोर |
नव्हता निर्धार आत्म्याचा ||१||
तेणे चित्ती भय साठले अपार |
दाटला अंधार चोहींकडे ||२||
तो ची अकस्मात पातला गणनाथ |
' ना भी ' ऐसा देत नाभिकार ||३||
झणीं सोsहं-दीप लावूनी अंतरी |
म्हणे गा निर्धारीं आत्मरूप ||४||
स्वामी म्हणे माथां ठेवितांची हात |
निर्भय निवांत जाहलों मी ||५||
[२३४]
कोण मी कोठील कां गा जन्माला आलों |
नाम-रूप ल्यालों कासयासी ||१||
कर्म ते करावे कोणते उचित |
पावें आत्म-हित कैशापरी ||२||
क्षणोक्षणीं ऐसा करावा विचार |
कैसा भव-पार पावेन मी ||३||
भंगुर ते भोग वाटती ना गोड |
लागलीसे ओढ परमार्थाची ||४||
स्वामी म्हणे येसी पावतां हे दशा |
सद्गुरू आपैसा भेटेचि गा ||५||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment