[९६]
देवा तूं सागर मी तुझी लहरी |
दोघांसी अंतरी भेद नाही ||१||
देवा तूं सुवर्ण मी तुझें भूषण |
दोघां एकपण ठाईचें चि ||२||
देवा तू चंद्रमा मी तुझी चंद्रिका |
आम्हां एकमेकां अभिन्नत्व ||३||
देवा तूं प्रदीप मी तुझा प्रकाश |
नांदूं सावकाश स्वामी म्हणे ||४||
[९७]
सांडुनी फलाशा स्व-कर्म आदरीं |
गीतेमाजीं हरि उपदेशी ||१||
साधितां स्व-कर्म होते चित्त-शुद्धी |
तेणे मोक्ष-सिद्धी लाभतसे ||२||
जोवरी अंतरी नाहीं आत्म-ज्ञान |
तोंवरी साधन कर्म हें चि ||३||
स्वामी म्हणे जाण होता आत्मज्ञान |
कर्माचे बंधन राहे चि ना ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment