[५२]
भावे हरी-नाम धरिसील कंठीं |
तरी चि वैकुंठीं वास घडे ||१||
एक वेळ पडे हरि-नाम कानीं |
पातकांची खाणी दग्ध होय ||२||
हरि-नाम सार हरि-नाम सार |
तेणें चि भव-पार पावसील ||३||
स्वामी म्हणे अंतीं हरि-नाम एक |
तारील नि:शंक तुजलागीं ||४||
[५३]
वेद-वेदांताचे संपादुनी ज्ञान |
देतसे व्याख्यान लोकांपुढे ||१||
अद्वैत-वेदांत मांडितो सिद्धांत |
देउनी दृष्टांत नानाविध ||२||
भला थोर ज्ञाता ऐसी कीर्ति होतां |
आला स्वर्ग हात ऐसें वाटे ||३||
स्वामी म्हणे नाहीं आत्म-समाधान |
व्यर्थ अभिमान पांडित्याचा ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment