Tuesday, March 29, 2011

[९४]
कां गा माझा तुज न ये कळवळा |
उदार दयाळा पांडुरंगा ||१||
दर्शनाची आस लागली जीवास |
झालों कासावीस तुजविण ||२||
दाटला हा गळा लागे न तो डोळा |
वाहे घळघळां अश्रुधारा ||३||
उतावीळ मन सुटूं पाहे भान |
दाखवीं चरण स्वामी म्हणे ||४||

[९५]
रूप चतुर्भुज सुंदर सावळे |
आजि म्यां देखिलें श्रीहरीचें ||१||
चरण सुकुमार कांसे पितांबर |
वैजयंती-हार कंठीं साजे ||२||
सुहास्य-वदन राजीव-लोचन |
मस्तकीं भूषण मुकुटाचें ||३||
शंख चक्र गदा पद्म करीं शोभे |
सन्मुख हें उभें स्वामी म्हणे ||४||

अभंग क्रं ९२,९३,९४ - स्वामीजींना सगुण दर्शनाचा १ ते १.५ वर्षे जो ध्यास लागला होता त्या काळात हे अभंग रचले गेले , त्या नंतर त्यांच्या जीवन चरित्रात जो सगुण साक्षात्काराचा प्रसंग आहे त्या नंतर अभंग क्रं ९५ रचला गेला .

No comments:

Post a Comment