[४०]
वेदांती तो बोले सृष्टी मिथ्या ऐसें |
भक्ता ती चि दिसे हरि-रूप ||१||
वेदांती ओळखे मिथ्या मायाभास |
हरीचा विलास भक्त म्हणे ||२||
दोहीचा भावार्थ सारिखा तत्वतां |
एक चि हरि-सत्ता सर्वां ठायीं ||३||
भक्ती तो चि ज्ञानी ज्ञानी तो चि भक्त |
जाणावा सिद्धान्त स्वामी म्हणे ||४||
[ ४१]
हरिपायी धांव घेतां उठाउठी |
आड उभे ठाती कामक्रोध ||१||
असों द्यावा चित्तीं एकनिष्ठ भाव |
भक्तालागीं देव सांभाळितो ||२||
स्वयें जगन्नाथ साधकाचा हात |
धरोनियां नीट चालवितो ||३||
साधकाकारणें घडे हें बोलणे |
ज्याचें तोचि जाणे स्वामी म्हणे ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment