Thursday, May 26, 2011

[१८१]
होतां कृष्णार्पण सर्व हि व्यापार ||
देही अहंकार राहे कैचा ||१||
करता करविता एकला श्रीहरि |
भाव हा अंतरी दृढावला ||२||
होवो निंदा-स्तुति न धरूं ती चित्तीं |
आळवूं श्री-पति भक्ति-भावे ||३||
स्वामी म्हणे जाता भक्तीचिया वाटे |
बोंचती न काटे विकल्पाचे ||४||

[१८२]
नको नको मना धनाचा अभिमान |
तेणें जनार्दन रुष्ट होय ||१||
नको नको मना लौकिकाचा पाश |
तेणें जगदिश दुरावेल ||२||
नको नको मना संसारी आसक्ती |
तेणें तो श्री-पति अंतरेल ||३||
स्वामी म्हणे मना होई गा तूं भृंग |
नित्य रमा-रंग-पाद-पद्मी ||४||

No comments:

Post a Comment