Wednesday, May 11, 2011

[१५८]
तीन पाउलांत व्यापिला त्रि-लोक |
काय तें कौतुक वामनाचें ||१||
झाला द्वार-पाळ बळीचा पाताळीं |
भक्तातें सांभाळी सर्वकाळ ||२||
वामनाचे पायीं ठेवोनियां डोई |
भक्ती-भावे होई लीन आतां ||३||
सर्वस्वाचे दान देतां वामनातें |
उरे न मनातें चिंता कांही ||४||
स्वामी म्हणे दान मागतो वामन |
त्यासी मीपण समर्पिले ||५||

[१५९]
वासुदेवविण न देखे दर्शन |
वासुदेवी मन स्थिरावले ||१||
आता अंतर्बाह्य वसे वासुदेव |
नसे रिता ठाव अणुमात्र ||२||
काय विश्व कोठें गेले मीतूंपण |
हारपलें भान एकाएकी ||३||
देवभक्तपण करोनी निर्माण |
आपुला आपण खेळतसे ||४||
स्वामी म्हणे झालो वासुदेवी लीन |
भावें लोटांगण घालोनिया ||५||

No comments:

Post a Comment