[१४५]
देह पराधीन नाशिवंत जाण |
वाया अभिमान वाहसी कां ||१||
गुंतुनी संसारी मानिसी मी-माझे |
बाळगिसी ओझे भ्रांतीचे चि ||२||
होई सावधान विचारीं कल्याण |
जेणे समाधान पावसील ||३||
स्वामी म्हणे मोह झुगारुनी दूर |
सदा राहें स्थिर आत्म-रुपी ||४||
[१४६]
आता मज एक विठ्ठलाचा छंद |
लौकिक-संबंध दूर केला ||१||
विठ्ठलावांचून न बोले वचन |
न देखे नयन दुजें काही ||२||
मज रात्र-दिन विठ्ठलाचें ध्यान |
वाटे जीव प्राण विठ्ठल चि ||३||
स्वामी म्हणे मज विठ्ठल प्रमाण |
वाहतसे आण विठ्ठलाची ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment