[११४]
जनलोक मज हांसो उपहासें |
लागलेंसे पिसें गोपालाचें ||१||
लौकिकाची लाज वाटे ना मनातें |
जोडिलें मी नातें गोपालाशीं ||२||
जनीं वनीं मनीं आप्त इष्ट कोणी |
गोपालावांचोनी नाहीं मज ||३||
आता सर्वकाळ गोपाळाची भेटी |
बोलूं गुजगोष्टी स्वामी म्हणे ||४||
[११५]
कां गा मना होसी दु:खी कशी खिन्न |
तुज काय न्यून सांगे मज ||१||
दु:खाचें कारण पाहें विचारून |
बुद्धीसी शरण जावोनियां ||२||
विषयांचा संग देई सुखदु:ख |
अनित्य ते देख होती जाती ||३||
स्वामी म्हणे व्हावें नित्य समाधान |
तरी करीं ध्यान स्व-रूपाचे ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment