Tuesday, April 5, 2011

[१०८]
संत ते उदार कृपेचे सागर |
त्यांचे उपकार काय वानूं ||१||
इच्छिती कल्याण देती आत्म-धन |
मज रांत्र-दिन सांभाळिती ||२||
स्व-रुपीं जागृत ठेविती संतत |
ठायीं ची भगवंत भेटविती ||३||
स्वामी म्हणे ऋण न फिटे म्हणोन |
भावे लोटांगण घालितसें ||४||

[१०९]
नांदतो एकला विश्वीं माझा मीच |
मज उंच नीच नाही कोणी ||१||
विश्वी नाही दुजे ह्यास्तव सहजें |
मत्सर नुपजे चित्तामाजीं ||२||
सांडोनियां मज गेले काम क्रोध |
होतां निज बोध अंतर्यामीं ||३||
स्वामी म्हणे मन जाहलें तल्लीन |
आतां नारायण अंतर्बाह्य ||४||

No comments:

Post a Comment