Friday, February 18, 2011

[ २१ ]
विश्वीं विश्वंभर जनीं जनार्दन |
मानिले वचन संतांचे हें||१||
सांडोनिया स्वार्थ लोक-सेवा-व्रत
आदरिलें येथ आवडींने ||२||
तों चि अवचित भेटला समर्थ |
स्वामी गणनाथ कृपार्णव ||३||
पूर्णकृपादृष्टी मातें अवलोकी |
ठेवुनी मस्तकीं कृपा-हस्त ||४|
सोsहम मंत्र गुज सांगितले कानीं |
शब्दाविण ध्वनि ऐकविला ||५||
'तत्वमसि' महावाक्य विवरुन |
ॐ काराची खुण दाखविली ||६||
पाहतां पाहतां गेलें देहभान |
झाली ओळखण स्व-रूपाची ||७||
स्वरूपीं लागली अखंड समाधि |
आटली उपाधी अविद्देची ||८||
मनाचे उन्मन होता ध्याता-ध्यान
ध्येयीं चि संपूर्ण मिसळली ||९||
गेले मी-तूं-पण एकला अभिन्न
जनी जनार्दन प्रकटला ||१०||
स्वामी म्हणे मज ऐसा साक्षात्कार
विश्वी विश्वंभर कोंदटला ||११||

No comments:

Post a Comment