Saturday, February 26, 2011

[ ३० ]
अनंत ब्रह्मांडे सांठविसी पोटीं |
तो तूं भक्तिसाठीं विकलासी ||१||
काय नेणों तुज भक्ति कां आवडे |
अर्जुनाचे घोडे खाजविसी ||२||
कां गा तूं बळीचा होसी द्वारपाळ |
रानीं ध्रुव बाळ सांभाळीसी ||३||
होसी विठु धेड फेडिसी तूं देणें |
दामाजीकारणें धावं घेसी ||४|
एकनाथाघरी वाहसी कां पाणी |
शेले कोण विणी कबिराचे ||५||
चोख्यामेळ्यासंगे कोण गुरें ओढी |
डेरे कोण घडी गोरोबाचे ||६||
जनाबाईसंगे कोण दळूं लागे |
आवडीनें सांगे गुज-गोष्टी ||७||
स्वामी म्हणे देवा तूं चि विश्वंभर |
भक्तांचा चाकर स्वयें होसी ||८||
[ ३१ ]
हरि-नाम हरि-नाम |
हा चि वर्णाश्रमधर्म ||१||
हरि-नाम हरि-नाम |
हा चि माझा व्रतनेम ||२||
हरि-नाम हरि-नाम |
हा चि माझा प्राणायाम ||३||
हरि-नाम हरि-नाम |
हें चि माझे नित्य-कर्म ||४||
हरि-नाम हरि-नाम |
हें चि माझे परंधाम ||५||
स्वामी जपे हरि-नाम |
तेणे अंतरी विश्राम ||६||

No comments:

Post a Comment