[२५३]
आड येतां विघ्न सोडी सुदर्शन |
भक्तां नारायण सांभाळितो ||१||
धरोनियां हात नेई पैलतीरा |
सोडवी संसारापासोनियां ||२||
पतित-पावन अनाथांचा नाथ |
पुरवी मनोरथ भाविकांचे ||३||
स्वामी म्हणे होई दासाचा हि दास |
येई नाना वेष धरोनियां ||४||
[२५४]
लौकिकाची मात सांडावी समस्त |
सेवावा एकांत आवडीनें ||१||
निर्वातीचा दीप तेवतो निवांत |
तैसी वृत्ती शांत असों द्यावी ||२||
अहंतेची नीद न लागो जीवास |
जागा सोsहं-ध्यास निरंतर ||३||
ठाईचि बैसोन करावें साधन |
भावें व्हावें लीन गुरुपाई ||४||
स्वामी म्हणे तुम्ही दिगंबरदास |
रहावें उदास देह-धर्मी ||५||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment