[२५१]
कोण पाहे देह सबळ दुर्बळ |
झालों मी केवळ ब्रह्मरूप ||१||
कोण पाहे आतां संपत्ती विपत्ती |
जाहलीसे मति आत्म-रूप ||२||
प्रपंचाचा ठाव गेला भेद-भाव |
प्रकटला देव अंतर्यामी ||३||
स्वामी म्हणे कैंचें उरे देह-भान |
होतां चि तल्लीन आत्म-रूप ||४||
[२५२]
आलीं विघ्नें दूर सारुनी सहज |
उद्धरिलें मज पांडुरंगें ||१||
लडीवाळपणें घेतली जे आळी |
ते तूं पूर्ण केली आवडीनें ||२||
सर्व काळ माझें लक्षोनियां हित |
सांभाळूनी नीट चालविलें ||३||
स्वामी म्हणे कैसा होऊं उतराई |
तुझ्या पायी डोई ठेवियेली ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment