[२५७]
छाया तैसा देह मानितों स्वभावें |
नाही आम्हां ठावें सुख-दु:ख ||१||
जन्म मरणाचा संपला संसार |
झाला साक्षात्कार स्व-रूपाचा ||२||
कैंचा देश-काळ विश्व चि केवळ |
माया-मृगजळ कळों आलें ||३||
स्वामी म्हणे आम्ही अनादि अनंत |
सुख-दु:खातीत स्वयंसिद्ध ||४||
[२५८]
काम-क्रोध-व्यथा नाहीं भय चिंता |
संसाराची वार्ता दूर ठेली ||१||
लौकिकाचा पांग फेडिला सहजें |
सांडोनिया ओझें अहंतेचे ||२||
न सोडवे मज आत्म-सुख गोडी |
भावें दिली बुडी प्रेम-रंगी ||३||
स्वामी म्हणे आता झालों सुख-रूप |
कोण करी माप स्वानंदाचे ||४||
[२५९]
देह नव्हे ऐसा केलों गुरु-राये |
देखिली म्या सोये स्व-रुपाची ||१||
जन्म-मरणाची संपली ते वार्ता |
दूर ठेली चिंता संसाराची ||२||
आतां आत्म-रूप झालें त्रिभुवन |
हारपले भान दिक्कालाचें ||३||
स्वामी म्हणे मन होतां चि उन्मन |
लाधलें निधन स्वानंदाचें ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment