Monday, December 31, 2012

सदा अबाधित सिद्धांत असा असो पुण्य वा पाप
पुरेपूर तें पदरी पडतें कर्म-फळाचें माप ।।८०।।
काल भविष्यात् स्वाधीन करुं वर्तमान-करणीनें
'प्रयत्न करितां परमेश्वरता प्राप्त ' अशीं सद्वचनें ।।८१।।
करू शृंखला -मुक्त जगाला लागूं उद्दोगाला
तरी कशाला कवि लिहील कीं 'जग बंदिशाला' ।।८२।।

Sunday, December 30, 2012

समानता मानव-धर्माचा नसेल भक्कम पाया
तरी इमारत यंत्र-युगाची उठेल मनुजा खाया ।।७७।।
कां धनिका बेकदर बंगला बांधुनियां नवलाखी
पहा उद्या जिंकील तुला ती गरिबांचीच हलाखी ।।७८।।
श्रीभगवान् सांगती भारती सिद्धांत असा बापा
'आत्मकारणात् ये पचन्ति ते भुज्जते त्वघं पापाः ।।७९।।

Saturday, December 29, 2012

नीतीच्या बदलती कल्पना कितीक कालपरत्वें
त्रिकाल असती परी अबाधित तिची मुळची तत्वें ।।७४।।
संयमांतुनी उगम कलेचा नीती ही तिची लीला
कला-नीतीचा संबध असा सत्कवींनी अनुभविला ।।७५।।
मात्र कलेची पूर्णावस्था स्वतंत्रता साचार
जगी कलेच्या नांवाखाली चाले स्वैराचार ।।७६।।

Friday, December 28, 2012

'असतो मा सद् गमय ' उपनिषद्वाणी दर्शवि ऋषिची
निज-उन्नतिची स्वाभाविक जी वृत्ति जीवमात्राची ।।७१।।
'सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म ' प्रत्यय ऋषिवर्याचा
उपनिषद् मिषें करि दुंदुभिरव शाश्वत आत्मसुखाचा ।।७२।।
निजानन्दनिर्भरा मुनीची वृत्ती साक्ष दे अजुनी
जरा उपनिषत्कालि रंगली ' हा ss उ हा ss उ ' म्हणुनी ।।७३।।

Thursday, December 27, 2012

तन्मय होतां कुठली बोली ती द्वैताद्वैताची
स्वानुभवाविण कोण जाणता स्व-संवेद्दता त्याची ।।६८।।
आठव नाठव नुरे स्वभावें स्फुरे एकलें एक
किंबहुना ही पुरे वर्णना स्व-स्थ होइ नावेक ! ।।६९।।
जरी सत्य अव्यक्त एक तें वाड्.मनोमतीपरतें
व्यक्तांतून चि सदा होतसे तदा विष्कृती येथें ।।७०।।

Wednesday, December 26, 2012

पूर्ण सत्य ते प्रसन्न-अन्तः स्फूर्तमात्र काव्यांत
वास्तव्य करी , व्यवहारी न च तथैव इतिहासांत ।।६४।।
नित्य-नूतन ध्येय पावतें प्रथम उगम काव्यांत
अन् तदनन्तर तें अवतरतें क्रमश: व्यवहारात ।।६५।।
ध्येय असावें सुदूर की जें कधी न हाती यावें
जीवेंभावें मात्र तयाच्या प्रकाशांत चालावें ।।६७।।

Tuesday, December 25, 2012

स्वानुभवाविण वेदांताची पोपटपंची वायां
स्वप्नी अमृता पिउनि कुणाची अमर जाहली काय ।।६१।
परोपदेशे पांडित्याचा प्रकर्ष बहु दाखवती
स्वयें आचरुं जातां बसते धारण पांचावरती ।।६२।।
गतानुगतिकत्वाची ऐसी पाहुनियां जन-रीति
विटलें मन जाउनि बैसलें हृदयाच्या एकांती ।।६३।।

Monday, December 24, 2012

अवर्णनीय स्वयंसिद्ध तू मला रूप ना रंग
परंतु माते , मज बोलाविते प्रेमळता नि:संग ! ।।५८।।
चिरंजीव परि सांप्रत झाला वेदांताचा अंत
मात्र तयाची भुतें नाचती इथें भरतखंडात ।।५९।।
पुरे पुस्तकी विद्या ती की अवघी पोपटपंची
रणार्थ सेना पत्र-चित्रिता असे काय कामाची ।।६०।।

Sunday, December 23, 2012

भले दिलें निज-पद जगदंबे मज अक्षय अविभाज्य
मी आत्म-बलें आज जिंकिलें लोकत्रय-साम्राज्य !।।५५।।
माते , त्वद् गुण-गानी वाणी श्रुती कीर्तन-श्रवणी
रुपी लोचन सहितबुद्धिमन चित्त गुंतले ध्यानी ।।५६।।
अगाध अनुपम अगम्य महिमा माझ्या जगदंबेचा
अनुभवितां मति-गति हि कुंठिता काय पाड शब्दांचा ।।५७।।

Saturday, December 22, 2012

जगज्जननि तव भक्ति-सुधेची पावन भिक्षा घाल
दारि पातला पहा तुझा हा भाग्यवंत कंगाल ।।५२।।
चाड भुक्तिची नाही जिवाला मुक्तीचें हि ना कोड
जगन्माउली दे अखंड तव भक्ति-सुखाची जोड ।।५३।।
सप्त-दिनी क्षिति-पति परीक्षिता करी शुकमुनी मुक्त
मी मातृ-कृपा-कटाक्षमात्रे क्षणांत केलों भक्त ।।५४।।

Friday, December 21, 2012

' भ्रमे , भ्रमो भड़गुर तें परतें ; होई तू मचित्त '
माता आपण अशी प्रतिक्षण होती शिकवण देत ।।४९।।
नटलों मी परि तुझाच कामी त्या होता ना हात
अतां ठेवसी 'न मम ' म्हणुनी कां कानावरती हात ।।५०।।
मजसि ह्या जगद्-रंगभूमिवर जसें दिलें त्वा सोंग
करीन संपादणी तशी मी राहुनियां नि:संग ।।५१।।

Thursday, December 20, 2012

निढळावरती नीट लाउनी आत्म-स्मृतिची तीट
भक्ती-सुखाचा मुखी घालिते साखरघांस अवीट ।।४६।।
म्हणे , 'अता जा बरे लाडक्या , नको गमावू वेळ
सकल सोंगाड्यासवे हवें ते सोंग घेउनी खेळ' ।४७।।
भवती गतिमत् जगदक्षरशः षण्मास परिभ्रमलें
निजली काया उभी कराया म्हणुनी चित्त न धजलें ।।४८।।

Monday, December 17, 2012

'भीती वाटली का बाळ तुला ?' ' छे गे , मुळीच नाही
माउली , तुझी मला मुलाला गमेल भीति काई ? ' ।।४३।।
आणि सांगते , ' पाडसा , असा दूर नको रे जाऊ
ये बाळ , तले देते बघ हा गोड गोडसा खाऊ '।।४४।।
तद्द्च पडता श्रवणि तेधवां धांव घेतली जवळी
तो च ती त्वरें वात्स्यल्य -भरें स्व-करें मज कुरवाळी ।।४५।।

Sunday, December 16, 2012

आप्त-मित्र दिन-रात्र सेविती प्रेमभरें षण्मास
त्वत्कृपें च माऊली , लाधली चिर-शांती जीवास ।।४०।।
निज-शय्येवरि देह दिसे परि असें कितीदा दूर
मातृचरणतल्लीन मन तदा नयनी लोटे नीर ।।४१।।
वृत्ती अचुंबित जधी रंगली जगदंबेच्या नामी
पुण्य -पाप-संबंध संपुनी नित्य पुनीत तदा मी ।।४२।।

Saturday, December 15, 2012

अनन्य भावें कड्यावरूनि जें उडी घेतली खाली
भक्त-वत्सला माउली मला फुला सारखी झेली ।।३७।।
तुज दाखविता म्हणते माया- मच्छीन्द्राचा खेळ
ऊठ बालका , हीच असे तव उद्धाराची वेळ ।।३८।।
धांव घेइ तत्क्षणी ठेवुनी भाव पावनी चरणी
कां विलंब लावील अंबिका भाविकासि उध्दरणी ।।३९।।

Friday, December 14, 2012

सदैव साक्षात ती जगदंबा असतां मज सांवरिती
होत अवनति तरी मागुती निश्चित येइन वरती ।।३४।।
माताजीचा-जगदंबेचा-वत्सलतेचा हात
पाठीवरुनी फिरता उठता होईन हातोहात ।।३५।।
काय न झाली अजुनि  माउली  मत्कर्माची  राख
दावि पाऊलें भक्तवत्सले , ब्रीद आपुलें राख ।।३६।।

Thursday, December 13, 2012

असेन जड होईन बुद्धिमान की भ्याड तरी धीट
प्रामाणिकता पश्च्यात्तापा न हो कारणीभूत ।।३१।।
प्रामाणिकता सांगेल मला घाली मोहांत उडी
रडी न खाइन बेडर माझी जरी निघाली तिरडी ।।३२।।
माझी कसली ती मोहाची मी नच जाईन हार
मत्संजीवन-सूत्र असें जें करि सहजें उध्दार ।।३३।।

Wednesday, December 12, 2012

आणि आमच्या पश्चात चाले कसा जगाचा गाडा
पाहो जातां दिसे पूर्ववत् सुरूच रामरगाडा ।।२८।।
तो चि महात्मा , ती च हिंद-भू , तें चि स्वातंत्र-रण
दृष्टीकोण तो मात्र बदलला येता चि मला मरण ।।२९।।
उघडा नेत्रे पहा चरित्रे इतिहासहि तो वाचा
संभवला का विनाश कोणा प्रामाणिक जीवाचा ।।३०।।

Tuesday, December 11, 2012

असे सहज परि सोsहंभावे करी सतत अभ्यास
हीच साधना जोवरी न तो झाला मोह निरास ।।२५।।
राम हमारा जप करता है सोsहं सोsहं
पहा कसा तो होतो आहे व्यामोहाचचा होम ! ।।२६।।
शुक्ल पक्ष भृगु-वासर रात्रौ आषाढीची नवमी
अठराशें छपन्न शकाब्दी म्रुत्यु पावलों आम्ही ।।२७।।

Monday, December 10, 2012

राखील जवें तो करुणेचा कानी पडता बोल
येवून स्वयें ती सुनिश्चयें तव चित्ताचा तोल ।।२२।।
यावत् सावध तावत् सोsहं-स्मरण अखंडित जाण
अढळ भाव सर्वथा असो मग जावो राहो प्राण !  ।।२३।।
अखंड अभ्यासाविण साध्य न ती समता चित्ताची
असे सुकर का समशेरीच्या कसरत धारेवरची ।।२४।।

Sunday, December 9, 2012

क्षणमप्यवतिष्ठते श्वसन् यदि न तु लाभवान स जन्तुः
कवि -कुल-गुरु कालिदास सुचवी जीवनमहती-हेतु ।।१९।।
जरि सत्कार्यी गेली जावो पार्थिव नश्वर काया
दिलीपामुखें तो चि सांगतो यशोदेह रक्षाया ।।२०।।
समता सुटतां श्रद्धापूर्वक सत्वर करुणा भाक
जगन्माउली एकली भली देईल तुला हाक ।।२१।।

Saturday, December 8, 2012

परिस्थितीशी झुंज खेळता खर्ची पडले प्राण
तरी न तुजविण अन्य स्थलि मन-बुद्धी ठेवुं गहाण ।।१६।।
पावन चरणी लीन होऊनी केली सादर अर्जी
निजेंतही मज नित्य जागवी जगदम्बेची मर्जी ।।१७।।
हवें कराया जीवें भावें सर्वस्वाचें दान
तन-मन-धन-गृह-सुत -दारादिक आणिक पंचप्राण ।।१८।।

Friday, December 7, 2012

निज -अंथरुणी होतो खिळुनी निजुनी चातुर्मास
नित्य विनवणी यावी म्हणुनी निर्भयता जीवास ।।१३।
पळापळानें करूनि मोकळा काळरूप गळफास
निर्भयतेचे पाठ शिकविते आज मला षण्मास ।।१४।।
प्रायश्यित्तासत्व मत्प्राण हि जरि मागत असशील
घे खुशाल ते परंतु मते जिते असो मम शील ।।१५।।

Thursday, December 6, 2012

दिला मान तो तिला वाहिला मला कशाला भार
पुरें मान पदरांत घातले तोलुनि भारंभार ।।१०।।
मनःपूत वागता अवचिता किंचित सुटला तोल
म्हणुनी पणाते काय लाविते प्राण हि ते बहुमोल ।।११।।
म्ह्न्मंगला मोह-मलिन मम मन बुद्धी आणि देह
प्रायश्यित्ते पावन करिते ह्यात न तिळ संदेह ।।१२।

Wednesday, December 5, 2012

जगी जन्मुनी जगदंबेचे दास होऊनी राहू
विश्व-बांधावांसहित सर्वदा भक्ति -सुधा-रस सेवू ।७।
काव्य-सेवका जगदंबेचे असे तुला वर-दान
ऐकुनि कविता जगत -रसिकता मुदें डोलविल मान ।८।
प्रमाण मानिल आणि आपुली स्वयें वाहते आण
अनुपम अभिनव तव कवनाला जनता देईल मान ।९।

Tuesday, December 4, 2012

जगी जन्मुनी अभिनव-जीवन-चित्रकार होईन
अनुभव-फलकावरी निज-कारे सत्य-चित्र रेखीन ।४।

जगी जन्मुनी अभिनव-जीवन-शिल्पकार होईन
अनुभव शीलेंतुनी कोरूनी सत्य-मूर्ती काढीन ।५।

जगी जन्मुनी अभिनव-जीवन-बागवान होईन
स्वानुभव-सुधा शिंपुनी वसुधा नंदनवन बनवीन ।६।

Monday, December 3, 2012


|  हरी ओम |

माताजी- हे जगन्मातर
भाग्यवान  तव नंदन ।
करी 'अमृतधारा' ह्या
तुझ्या तुज 'समर्पण
              --- स्वामी स्वरूपानंद



जगी जन्मुनी अभिनव -जीवन -सत्कविवर होईन
स्वानुभवान्त :स्फुर्त नवरसी सत्य-काव्य निर्मीन ।१।

जगी जन्मुनी अभिनव-जीवन-गायकवर होईन
अनुभव-सप्तस्वरी सदोदित सत्य-गीत गाईन ।२।

जगी जन्मुनी अभिनव-जीवन-तंतकार होईन ।
अनुभव वीणेतून सुसंगत सत्य-स्वन काढीन ।३।।