Tuesday, January 29, 2013

साधनी असावें तत्पर ।
संकटी न संडावा धीर ।
सोहं -स्मरणे वारंवार
निजांतर चोखाळावें ।।१।।

नाना वृतींचे स्फुरण ।
अंतरी होतसे कोठून ।
साक्षित्व पहावें आपुलें आपण ।
अति अलिप्तपण ठेवोनिया ।।२।।

सर्वेन्द्रियांसहवर्तमान ।
मन बुद्धि आणि अहंपण ।
आत्मारामीं समर्पून ।
निज-निवान्तपण समर्पून ।।३।।

चालता बोलतां हिंडतां फिरतां ।
लिहितां वाचितां खातां जेवितां ।
नाना सुखदु:ख-भोग भोगितां ।
निजात्मसत्ता आठवावी ।।४।।

होतां सोहं-भजनीं तन्मय ।
एकवटोनि ज्ञाता ज्ञेय ।
घेई आत्मसुखाचा प्रत्यय ।


नाद-श्रवण प्रकाश-दर्शन ।
तेथें श्रोता द्रष्टा कोण ।
तो आत्मा चि मी हें ओळखून ।
तदनुसंधान राखावें ।।६।।

सदा स्व-रूपानुसंधान ।
हेचि भक्ति हेंचि ज्ञान ।
तेणें तुटोनी कर्म-बंधन ।
परम समाधान प्राप्त होय ।।७।।

क्लेश-रहित संतोषी जीवन ।
प्रयाणकाली सोहं-स्मरण ।
घडो आवडी परमार्थ-चिंतन ।
आशीर्वचन तुम्हांसी हें ।।८।।     --प.पू  स्वामी स्वरूपानंद

Sunday, January 27, 2013

स्थैर्य प्रज्ञेप्रति त्वकृपें पूर्ण तपस्या झाली
त्वदाज्ञेस अनुसरून आतां ठेवुं लेखनी खालीं ।।१६१।।
जगन्माऊली , आज्ञा होतां ती पुनरपि उचलूंच
भक्त होऊनी त्वद्-यशोध्वजा जगीं उभारुं उंच ।।१६२।।
 

Saturday, January 26, 2013

आजकालचे नव्हों च आम्ही जुनेपुराणे जाणें
असे दाखला नमूद केला पहा दफ्तरी तेणें ।।१५८।।
पाठवि येथें ती आम्हांतें मातेची नवलाई
चाकर आम्ही दिधल्या कामी न करुं कधिं कुचराई ।।१५९।।
मी-तूंपण अस्तवलें आलें साधनेस पूर्णत्व
कणकणांत कोंदले एकलें एक नित्य सत्तत्व ।।१६०।।
 

Friday, January 25, 2013

सोsहं तें हि अस्तावलें तें नाहिं भोगिलें माते
सोsहं-दर्शन अनुभविलें तें लिहुनि ठेविलें येथे ।।१५५।।
आला अनुभव देव तूं तसा भक्त हि तूं स्वयमेव
लीला-राघव हें अपूर्व तव पाहे तो चि स-दैव ।।१५६।।
अद्वय-भक्ति येतां हाती सरली यातायाती
बुडतां अमृतीं मरण तरी का संभवेल कल्पान्तीं ।।१५७।।
 

Thursday, January 24, 2013

संतत संगें सोsहं जिवलग सांगे मज गुज गोष्टी
चिर-सुखद असा सखा न दुसरा जरी धुंडली सृष्टी ।।१५२।।
औटपीठिं करि चम् चम् सोsहं-तारा तेज:पुंज
तेजें सहजें जाण लोपला माया-ममता फुंज ।।१५३।।
प्रसन्न होतां माता हाता चढले सोsहं-सार
हवा कशाला मला अतां वृथा शास्त्र संभार! ।।१५४।।
 

Wednesday, January 23, 2013

विनावैखरी होत अंतरी सोsहं शब्दोच्चार
सहज-भजन-अभ्यसन जंव नसे अद्वैती व्यापार ।।१४९।।
"ला इलाह इल्लिला ' पढती है यहि दुनिया कल्मा
होतां सोsहं ध्यान अन्तरी ती साथ करी आम्हां ।।१५०।।
सुमन तति- द्रुम-लता डोलती ध्याती सोsहं सोsहम्
मी हि तयांसंगतीं नाचतों गातो सोsहं सोsहम् ।।१५१।।
 

Tuesday, January 22, 2013

सावधान मन करि रात्रं-दिन सोsहं-मंत्रजपातें
अवन करी तें अखंड फिरतें तलवारीचें पातें ।।१४६।।
सावधमनसा अखंड परिसा हें सोsहं संगीत
जागृतचित्तें सुखनैव जा गान-सुधा सेवीत ।।१४७।।
अन्तरातुनी सहज-ध्वनि तो निघतो सोsहं सोsहम्
विनाश्रवण ऐकतां तोषतो माझा आत्माराम ।।१४८।।
 

Monday, January 21, 2013

ढूम् ढूम् ढूम् शब्दांच्या नावें ढोंग-ढोलकीसंगे
सांगे तैशीं टाकित होतो पाउले पुढें-मागे ।।१४३।।
ढोल फोडिला झूल-घुंगुरां दिलें झुगारूनि दूर
सोsहं-भावे उडी घेतली अनन्तांत चौखूर ।।१४४।।
मरण-भय तदा अन्त:करणीं कारण मोहावरण
सोsहं-स्मरणें परि आतां दिले निर्भयतेनें ठाण ।।१४५।।
 

Sunday, January 20, 2013

गलित यौवनी अल्पहि करणें न लगे पश्चाताप
तैं शांतपणें तन्मय नयनें मिटतिल आपेंआप ।।१४०।।
वेदान्ताच्या थोतांडाची पाठीवरतीं झूल
घालूनी तदा होतों सजलों तुंदिल नंदीबैल ।।१४१।।
गळ्यांत खुळखुळ वाजत होते विषयांचे घुंगुर
पिटुनि ढोलकी 'हलिव मुंडकी ' म्हणे मीपणा थोर ।।१४२।।
 

Saturday, January 19, 2013

म्हणति आणि ते 'कोण कुणाचा करी येथ उध्दार
स्वयें कष्टल्याविण का होतो कोठें आत्मोद्धार' ।। १३७।।
त्याच खुणेने तन्मयतेनें आक्रमितां सत्पंथ
प्रमाण अन्त:करण , तत्वतां लागे प्रांत अनन्त ! ।१३८।।
बाल्यापासुनि गीताध्ययनी होता मज बहु छंद
तारुण्यी तत्कथित-तत्व-सुख भोगीं आज अगाध ।।१३९।।
 

Friday, January 18, 2013

पुण्य-पत्तनीं श्री सद्गुरुनीं पथ-दर्शी होऊन
' तत्वं सोsहं सः ' श्रुतिची दाखविली मज खूण ।।१३४।।
आदिनाथ मत्स्येंद्र गोरख श्रीगहिनी निवृत्ती
ज्ञानदेव देवचूडामणी गुण्डाख्यादि महंती ।।१३५।।
अनुभविली सद् विद्या ही गुरु-परंपरा सांगितली
शतानुशतक प्रत्यक्ष जशी पुढती चालत आली ।।१३६।।
 

Thursday, January 17, 2013

हा तो अनुभव मायोद्भव सुख-दु:ख -द्वन्द्व अनित्य
मात्र एकला सर्वव्यापी आत्मा शाश्वत सत्य ।।१३१।।
ती इतस्तत: सर्वत: पहा संप्लुत चित्पुष्करिणी
आत्म-सुखाचा अखंड निर्झर वाहे अंतकरणीं ।।१३२।।
सदैव मातें जागवितें निज-जीवन-तत्वज्ञान
न कां स्वभावे त्यास्तव व्हावें सर्वस्वाचे दान ।।१३३।
 

Wednesday, January 16, 2013

मृत्यू पावणें पुनः जन्मणें हा मायेस्तव भास
असें व्यापुनी अणुअणूतुनी मींच अखिल जगतास ।।१२८।।
अनाद्दनन्त स्फुरें एकला गिळुनी आत्मज्ञान
पुरे मला उध्दार कराया माझें तत्व-ज्ञान ।।१२९।।
चित् शक्तीचा गभीर सागर जगत्-रूप हा फेन
मी स्वानुभवें सत्य नित्य ह्या तत्वज्ञानिं जगेन ।।१३०।।
 

Tuesday, January 15, 2013

त्रिखंड हिंडे मुखें बडबडे सावध-वेडापीर
मी विश्व-सखा मला सारखा अमीर आणि फकीर ।।१२५।।
ऐक मात ही सदैव पाहीं मी दिक्कालातीत
आज ना उद्यां जरि नश्वर देह मिळे मातीत ।।१२६।।
विनाश म्हणजे पुनर्जन्म अन् जन्मासंगे नाश
असा चक्रनेमिक्रम चाले जोवरि माया-पाश ।।१२७।।
 

Monday, January 14, 2013

निज-माते सारिखी लेखितों सदा पर स्त्री देखा
असो कुणी सुंदर अप्सरा किंवा ते शूर्पणखा ।।१२२।।
नसानसांतुनि तें संतांचे नाचे अस्सल रक्त
जाण साजणि आजपासुनी आम्ही जीवन्मुक्त ।।१२३।
कर्मविपाकें जाण मला गे लागे सावध-वेड
जीवन्मुक्तास हि न चुकतें प्रारब्धाची फेड ! ।।१२४।।
 

Sunday, January 13, 2013

षड् रिपुंनो म खवळता कशाला मजवरि वेळोवेळां
असें वेगळा या बाळानो , खुशाल खिदळा खेळा ।।११९।।
नसता तुम्ही तरि संतांना जगांत पुसता कोण
रिपु तयांला सहाय्य झालां या सुखेन धांवोन ।।१२०।।
कोमल अन्त:करण आमुचें जणुं फुलाहुनी फुल
परि वज्राहुनि कठिण लागतां मोहाची चाहूल ।।१२१।।
 

Saturday, January 12, 2013

सद्भाक्ताची सदा वाहणें भगवंतानें चिंता
तो चि तयाचा पंथ-दर्शि तथा रक्षिता समुद्धर्ता ।।११६।।
वाट चोरते करुं पाहती षड्रिपु वारंवार
परी तीक्ष्णतर माझ्या सोsहं तलवारीची धार ।।११७।।
झुंज कशाचें कौतुक साचें हें जीवनमुक्ताचें
तो विश्वाचें मूळ जाणुनी ब्रह्मानन्दें नाचे ।।११८।।
 

Friday, January 11, 2013

प्राण बुद्धि मन काया माझीं परि मी त्यांचा नाहीं
तीहि नव्हती माझीं कैसें लीला-कौतुक पाहीं ! ।।११३।।
गूढ न कांहीं येथ सर्वथा उघड सर्व वाक्याचा
जाण चराचरिं भरूनि राहिलों मीच एकला साचा ।।११४।।
आत्मतृप्त जीं ऐशा रीती होती निस्त्रैगुण्य
असोत नारी-नर अक्षरशः संसारी तीं धन्य ।।११५।।
 

Thursday, January 10, 2013

मी-माझे भ्रांतीचें ओझें उतर खालतीं आधीं
तरिच तत्वतां क्षणांत हाता येते सहज-समाधि ।।११०।।
सहज-समाधी संतत साधीं न लगे साधन अन्य
सुटुनी आधि-व्याधी-उपाधि होतें जीवन धन्य ।।१११।।
'मी मी' म्हणसी परी जाणसी काय खरा 'मी' कोण
असे काय 'मी मन ' , 'बुद्धी' , वा 'प्राण' पहा निरखोन ।।११२।।
 

Wednesday, January 9, 2013

संकल्पास्त्व तो संभवतो भूतांचा आभास
नि:संकल्पी मीच मी स्वयें सांगे विश्व-निवास ।।१०७।।
यदृच्छोविना हालत नाहीं वृक्षाचें ही पान
उगाच कां वाहसी मानवा वाउगाच अभिमान ।।१०८।।
पाहिं सर्वथा श्रद्धाहीना नाहीं येथें सोय
काय चन्द्रिका बका दीपिका वा जात्यंधा होय ! ।।१०९।।
 

Tuesday, January 8, 2013

ॐ तत् सत् साम्राज्य आपुलें तीन पाऊलें प्रांत
क्षणीं तयांनीं परी व्यापिले लोक-त्रय निभ्रांत ।।१०४।।
अखंड-जागृत संतां घराचा कैसा अजब तमाशा
हवा कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा ।।१०५।।
स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक
कळाया हवा तरी पहावा नित्यनित्य-विवेक ।।१०६।।

Monday, January 7, 2013

' भुः भुः भुः भुंकतें श्वान तें ? छे ! छे ! प्यारेराम
'डरॉव डरॉव डरॉव ' बेडूक ओरडे ? छे रे आत्माराम ।।१०१।।
'चिंव चिंव ' गाते चिमणी ? छे ! छे ! प्यारेराम
'टिटिव् टिटिव् टिटिव् ' टिटवी ? छे रे ! माझा आत्माराम ।।१०२।।
कोड जिवाचे परमात्म्याचे नित्य दिसावे पाय
अनन्य होणें ह्याविण नेणें भलता सुलभ उपाय ।।१०३।।
 

Sunday, January 6, 2013

सदैव मार्गी चालत असता मजला देतो हात
उठतां बसतां उभा पाठिशीं त्रलोक्याचा नाथ ।।९८।।
प्रसन्न मन सहजासन सु-वसन अर्धोन्मीलित नेत्र
स्व-स्थ अन्तरीं तत्पद-चिंतन करी दिन-रात्र ।।९९।।
निधान सन्निध परि घोर तमीं इतस्ततः भ्रमलो मी
ज्ञान-किरण-दर्शनें अतां सत्प्रकाश अन्तर्यामीं ।।१००।।
 

Saturday, January 5, 2013

असो, सकळ जन तो काळाच्या पडतो भक्ष्य-स्थानीं
मात्र एकला अमर जाहला जगांत आत्म-ज्ञानी ! ।।९५।।
सुहास्य-वदन प्रसन्न दर्शननिर्मल अन्तःकरण
मित मधु भाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण ।।९६।।
एवं षड्विध सज्जन-लक्षण अंगिं बाणतां पूर्ण
होतो वश परमेश वाहतों जगदंबेची आण ।।९७।।

Friday, January 4, 2013

जों न ती कानीं आली काळाची आरोळी
मॊह जाळुनी होइं मोकळा वाजवुनी कर-टाळी ।।९२।।
गाझी सीझर असो शिकंदर किंवा कैसर झार
चुके न अंती मानेवरतीं मृत्यूची तलवार ।।९३।।
असो मुसोलीनी रण सेनानी असो हेर हिटलर
फिरेल अंती मानेवरतीं काळाची समशेर ।।९४।।

Thursday, January 3, 2013

'न जातु काम: शाम्यति कामानामुपभोगेन ' इति
नृपति -ययाति -प्रचीत कथिते दशसहस्त्रवर्षांतीं ।।८९।।
कामः क्रोधस्तता लोभ हे नरकद्वार त्रि-विध
सार्थ वचन गीतेंत सांगतो पार्थसखा गोविंद ।।९०।।
करीं च काही त्वरा जोंवरी जरा-मरण तें दूर
जरा न नजरानजर जाहली तों च पालटे नूर ।।९१।।

Wednesday, January 2, 2013

पुण्य-पातक स्वर्ग-नरक ह्या शुष्क कल्पना मात्र
भय दावुनि सत्पथा न्यावया प्रसृत जरी सर्वत्र ।।८६।।
काय भय करी उन्नति प्रेमळता किंवा ती
निर्णय दिधला आत्मकृतीनी जगतीं प्रेमळ संती ।।८७।।
मायिक नश्वर विषय सुखास्तव माजविले बडिवारें
आत्मदेव अव्हेरुनि आम्ही देवाचे देव्हारे ।।८८।।

Tuesday, January 1, 2013

बाजारी ह्या जो तो करितो व्यवहाराचा धंदा
क्रीडे काव्य-व्यवहारीं परि लाखांतुनि एखादा ।।८३।।
तयांत विरळा सत्कवि निपजे अनुभवी जो निज कविता
सत्कवींत हि क्वचित् संभवे अनुभवुनि आचारीता ।।८४।।
अडूब सांगड जयें बांधिली काव्य-व्यवहाराची
खरा यशस्वी तो चि ह्या जगीं कृतार्थ कविता त्याची ।।८५।।